नवी दिल्ली : नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे पूर्णपणे आॅप्टिकल फायबरने युक्त कम्युनिकेशन एक्स्प्रेस मार्ग असेल. या मार्गावर सीसीटीव्ही लागलेले असतील. हा मार्ग तयार झाल्यानंतर नागपूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ ९ ते १० तासांत पूर्ण करता येईल. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे तीन ते चार वर्षांत पूर्ण करणे कठीण वाटते. परंतु आम्ही हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केल्याचे शिंदे म्हणाले.शिंदे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या समक्ष नागपूर-मुंबई कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे चे सादरीकरण केले. हा मार्ग सहा ऐवजी आठ पदरी करावा, अशी सूचना करून गडकरी यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शिंदे यांना यावेळी दिले. या संदर्भात आठ ते दहा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली बैठक होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.गडकरींना भेटल्यानंतर शिंदे यांनी सांगितले की, या नागपूर-मुंबई कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे ची लांबी ८१९ कि.मी राहील. सध्या सहा पदरी मार्गाचे सादरीकरण करण्यात आले आहे. परंतु हा मार्ग आठ पदरी असावा, अशी गडकरींची इच्छा आहे. त्या संदर्भात आणखी एक सादरीकरण करावे लागेल. याचे काम पूर्ण झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण हे प्रांत परस्परांशी जोडले जातील. सोबतच मार्गाच्या दोन्ही बाजूंना लागून असलेल्या भागांचाही विकास होईल, शिवाय उड्डाण पुलांची संख्या, सुरक्षा आणि सुविधांचा तपशीलही दिला.
नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे २०१९ पर्यंत पूर्ण करणार
By admin | Published: August 21, 2015 1:12 AM