'नागपूरचा निकरवाला' तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही, राहुल गांधी कडाडले
By महेश गलांडे | Published: January 25, 2021 08:16 AM2021-01-25T08:16:41+5:302021-01-25T08:38:41+5:30
"महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही.
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. जनतेला संबोधित करताना त्यांनी विविध मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोईंबत्तूरमध्ये पोहचले आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. शनिवारी राहुल यांनी तिरुपूरमधील जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर टीकास्त्र सो़डलं आहे. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.
"महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच, नागपूरचा निकरवाला तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही, आता इथले युवकच तामिळनाडूचं भविष्य ठरवतील, त्यांच्या मदतीला मी आलोय, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधींनी जबरी टीका केलीय. तर, 'नरेंद्र मोदी एक एक करून देशातील जनतेशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू विकत आहेत. मोदींनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि जनतेच्या मालकीचं सर्व काही विकत आहेत' असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
#WATCH | We'll not allow Narendra Modi to destroy the foundation of India...He doesn't understand that only Tamil people can decide the future of Tamil Nadu. 'Knickerwallahs' from Nagpur can never ever decide future of the state: Congress' Rahul Gandhi in Dharapuram, Tamil Nadu pic.twitter.com/KFDaXKeTMG
— ANI (@ANI) January 24, 2021
"पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे. तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोड शो चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच यासोबत पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये येऊन खूश असल्याचं म्हटलं आहे.