जयपूर - जयपूरच्या नाहरगड किल्ल्यातील मृत्यू प्रकरणाच्या तपासात मोबाइल फोन महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारी जयपूरच्या नाहरगड किल्ल्यातील भिंतीवर चेतन सैनी या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मृत्यूपूर्वी चेतनने त्याच्या मोबाईल फोनमधून काही सेल्फी फोटो काढले होते. हे फोटो या रहस्यमयी मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्वपूर्ण ठरतील असा पोलिसांचा कयास आहे.
पोलिसांनी पुढील तपासासाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे हा मोबाईल दिल आहे. मृताने ऑनलाइन व्हिडिओ अपलोड केला होता का ? त्याची सुद्धा माहिती पोलिसांनी मागितली आहे. सध्या पद्मावती चित्रपटावरुन राजस्थानात मोठा वाद सुरु आहे. या मृत्यूला पद्मावती चित्रपटाच्या वादाशी जोडले जात आहे.
धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर 'आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही' असं कोळशाने लिहिलं होतं. चेतन सैनी गुरुवारी दुपारी 3.30 वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतलाच नाही. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी नाहरगड किल्ल्याच्या भिंतीवर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला व तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना मृतदेह तपासत असताना पँटच्या एका खिशात मोबाईल फोन आणि पाकिट सापडले. मोबाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये मृताने काही सेल्फी फोटो काढल्याचे दिसले अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रफुल्ल कुमार यांनी दिली. मृतदेहाशेजारी चेतन तांत्रिकचं नाव भिंतीवर लिहिलेलं होतं. असं म्हटलं जातं की, चेतन तांत्रिक राजा रतन सिंहच्या दरबारात होता आणि तिथून हाकलल्यानंतर तो अल्लाऊद्दीन खिलजीला जाऊन भेटला. त्यानेच खिलजीला पद्मावतीबाबत सांगितलं होतं.
राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंह यांनी मात्र या घटनेशी आपल्या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. 'आंदोलन करण्याची ही आमची पद्धत नाही. अशाप्रकारच्या आंदोलनाला लोकांनीही पाठिंबा देऊ नये', असं महिपाल सिंह बोलले आहेत.
करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकीभारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स जाळण्याची धमकी दिली आहे. 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोव-यात सापडल्यामुळे भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. पण इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे. दरम्यान करणी सेनेचे नेता सुखदेव सिंग यांनी युकेमध्ये ज्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावती दाखवण्यात येईल, ती सर्व चित्रपटगृह जाळण्याची धमकी दिली आहे.