लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, ‘आप’सह बहुतांश विरोधी पक्षांनी मंगळवारी राज्यसभेतून सभात्याग केला. त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब झाले.विरोधी खासदार बाहेर पडताच पत्रकारांना भेटले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले की, विविध राज्यांतील जनहिताचे मुद्दे मांडणे हे विरोधी खासदारांचे कामच आहे. काही मुद्दे इतके संवेदनशील असतात की त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा नोटीस देण्यापुरता वेळही नसतो. विषयाचे गांभीर्य लक्षात घेउन त्यावर खासदारांना बोलू दिले जात होते. व्यंकय्या नायडू ही परंपरा पाळायला तयार नसून, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यावेळी म्हणाले की, सभापतींचा हाच पवित्रा कायम राहिला तर की पुढे काय करायचे, याचा निर्णय विरोधकांना घ्यावा लागेल. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले, सभागृहाच्या आत आणि बाहेर लोकशाहीचा गळा घोटण्याचाच हा प्रकार आहे आम्ही सारे विरोधक त्यामुळेच एकत्र आलो आहोत. आपचे संजयसिंग म्हणाले की, आज सभागृह सुरळीत सुरू होते. कोणीही सदस्य गोंधळ व गदारोळ करीत नव्हता. बोलण्यासाठी काही सदस्य जागांवर उभे राहून सभापतींची परवानगी मागत होते. त्यांना बोलण्याची संधी देऊ न सभापती शांतही करू शकले असते. मात्र त्यांनी ५ मिनिटात २ वाजेपर्यंत त्यांनी कामकाज तहकूब करून टाकले.
लोकसभेत सत्ताधार्यांचा गोंधळराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलायला काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे उभे राहिले, तेव्हा भाजप व रालोआच्या आंध्रच्या सदारांनी दुसर्याच विषयावर गदारोळ माजवून खरगेंना बोलू दिले नाही. सत्ताधारी व विरोधकांची तडजोड झाल्यावर मात्र दुपारी खरगेंचे भाषण झाले.