नवी दिल्ली : शनिवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी ‘रालोआ’चे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांना मिळालेली ५१६ मते ही गेल्या ३३ वर्षांत या पदावर विजयी झालेल्या कोणत्याही उमेदवाराहून सर्वाधिक मते आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘राओला’चे रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या खासदारांच्या ५२२ मतांच्या तुलनेत नायडू यांना सहा मते कमी मिळाली असली तरी विरोधी पक्षांची मते फुटल्याने नायडू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.नायडू यांचे निवडणूक एजंट व या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून नेमलेले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणाले की, काटेकोर नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार यामुळे पक्षाच्या सर्व खासदारांची मते वैध ठरली व ती नायडू यांच्या बाजूने दिली गेली.ज्या १४ खासदारांनी मतदान केले नाही त्यापैकी १२ विरोधी पक्षांचे होते. भाजपाचे दोन खासदार इस्पितळात असल्याने मतदानास येऊ शकले नाहीत.नायडू यांना अपेक्षेपेक्षा १७ मते जास्त मिळाल्याचा हिशेब सांगताना पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की,राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवारास ५२२ खासदारांची मते मिळाली होती. मात्र त्यापैकी बिजू जनता दल व जदयू या दोन पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविल्याने नायडू यांची अपेक्षित मते ४० ने कमी होऊन ४८२ वर आली होती.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या १७ खासदारांची मते अवैध ठरली होती. यावेळी चौघांची मते अवैध ठरली. त्यामुळे हे मते गृहित धरली तर नायडू यांची एकूण अपेक्षित मते ४९५ एवढी होती. १० नामनिर्देशित खासदारांनी बहुतांश नायडूंना मते दिली असे गृहित धरले तरी नायडूंना मिळालेली त्याहून अधिकची मते विरोधी पक्षाच्या खासदारांकडून मिळाली हे उघड आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.इशारा देऊनही चूक केलीभाजपाच्या एकाही खासदाराचे मत बाद ठरून वाया जाता कामा नये, असा सक्त इशारा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिला होता. एवढेच नव्हे तर मत देताना कोणत्या चुका होतात हे समजावे व त्या टाळल्या जाव्या यासाठी पक्षाने प्रतिरूप मतदानही आयोजित केले होते. तरीही शनिवारच्या मतदानात रालोआची चार अपेक्षित मते बाद ठरली. काँग्रेसचे दोन खासदार मतदानास आले नाहीत व त्याची कारणेही पक्षाने दिली नाहीत. या दोघांवर काय कारवाई करायची ते नंतर पाहू, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद म्हणाले.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडूंना अपेक्षेहून जास्त मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 1:01 AM