नैनीताल - उत्तराखंडच्या औली येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न होणार आहे. मात्र या लग्नाविरोधात नैनीताल कोर्टात याचिका दाखल झाली आहे. नैनीताल हायकोर्टाने याबाबत उत्तराखंड सरकारकडून उत्तर मागवलं आहे. कोर्टाने या प्रकरणाला गंभीरतेने घेऊन औली येथे लग्न करण्याची परवानगी गुप्ता बंधूंना कोणी दिली असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसेच आजच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने औली येथील लग्नस्थळाची पाहणी करावी आणि उद्यापर्यंत अहवाल द्यावा असे आदेश दिले आहेत.
उत्तराखंड सरकारने आज दुपारी 2 पर्यंत याबाबत स्पष्टीकरण द्यावं. औली येथे हेलिपॅड बनविण्यासाठी किती झाडे कापली गेली? हेलिपॅड बनविले आहे का? औलीमध्ये लग्न करण्याची परवानगी दिली कोणी? असे प्रश्न मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन यांच्या खंडपीठाने उत्तराखंड सरकारला विचारले आहेत. तसेच कोर्टाने पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या गुप्ता बंधूंकडून पाच कोटी रुपये भरपाई केली आहे की नाही असंही विचारलं आहे. काशीपूरचे रहिवाशी रक्षित जोशी यांनी जनहित याचिका केली त्यावर नैनीताल हायकोर्टाने सुनावणी केली.
गुप्ता बंधू कुटुंबासह औली येथे पोहचले असून उद्यापासून हा लग्नाचा कार्यक्रम सुरु होणार आहे. औली येथे 18 ते 22 जूनपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लग्नाच्या पूर्वसंध्येला 17 जूनरोजी आयोजकांकडून स्थानिक लोकांना भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील एनआरआय भारतीय उद्योजकाच्या मुलांची हाय-प्रोफाईल लग्न भारतातील उत्तराखंड येथील शानदार हिल स्टेशनजवळ होणार आहे. या लग्नासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचे लग्न 18-20 जून दरम्यान होईल तर त्यांच्या छोटे बंधू अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांकचं लग्न 20-22 जून दरम्यान होणार आहे. सूर्यकांत याचे लग्न हिरा व्यापाऱ्याच्या मुलीशी तर शशांकचे लग्न दुबईतील उद्योजकाच्या मुलीशी होणार आहे.
उत्तराखंडमधील हिल स्टेशन औली येथे गुप्ता कुटुंबीयातील मुलांची लग्न होणार आहे. या लग्नासाठी औली परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसोर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत. लग्नाच्या सजावटीसाठी लागणारी फुलं स्विर्झंलंडमधून 5 कोटी रुपयांना मागविण्यात आली आहेत. तसेच दिल्लीहून पाहुण्यांना औली येथे आणण्यासाठी जवळपास 200 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आली आहेत. या रॉयल लग्नासाठी 100 पंडितांचे बुकींग करण्यात आलं आहे. लग्नाची आमंत्रण पत्रिकाही चांदीपासून बनविण्यात आली असून त्याचं वजन साडेचार किलो आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील अजय गुप्ता, अतुल गुप्ता, राजेश गुप्ता यांनी दक्षिण आफ्रिकेत उद्योगाचा साम्राज्य उभं केलं आहे. 1993 च्या आधी गुप्ता कुटुंबीय सहारनपूर येथील रायवाला मार्केटमध्ये रेशनचं दुकान चालवत असे.