नवी दिल्ली - ज्याला हिरो समजून लोक सेल्फी घ्यायचे तो कुख्यात चोर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील नजफगड परिसरातील तरुणांमध्ये या आरोपीची एवढी क्रेझ होती की ते चक्क पैसे मोजून त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचे. या चोराने अन्य चार सहकाऱ्यांसह टोळी बनवली होती, या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. नजफगडमधील नंदू गँगच्या कुकृत्यांपासून धडा घेत त्यांनी रविवारी एक कॅब लुटली, पण द्वारका जिल्ह्यातील स्पेशल स्टाफने त्यांना बेड्या ठोकल्या. विक्रम असे या चोराचे नाव असून, आकाश आणि सागर अशी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची नावे आहेत, तर दोन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी कॅब लुटताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झ़डती घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक काडतूस आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच ही लूट करण्यासाठी ते ज्या दुचाकीवरून आले होते तीसुद्धा चोरीची असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान विक्रमने दिलेल्या माहितीनुसार, तो 12 पास असून, त्याला महागड्या सिगारेट्स आणि बीयर प्यायचे व्यसन आहे. तसेच झटपट पैसे कमाऊन श्रीमंत होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी नजफगडमधील नंदू गँगचा आदर्श त्याने डोळ्यांसमोर ठेवला आहे. इतकेच नाही तर विक्रम हा नजफगडमध्ये खूप प्रसिद्ध असून, तेथील तरुणांमध्ये त्याची सेल्फी घेण्याची क्रेझ दिसून येत आहे. तसेच तो आपल्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी 500 ते 2500 हजार रुपये घेत असे.
हिरो समजून ज्याच्यासोबत घ्यायचे सेल्फी, तो निघाला चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 11:13 AM