नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. घरात नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. गृहप्रवेशाआधीच नवरीचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा (Nalanda) मधील सोहसराय ठाण्याच्या हद्दीतील बंधू बाजार परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
बंधु बाजारमधील निवासी मनोज पंडित यांचा मुलगा विकास याचा सोमवारी रात्री विवाह सोहळा संपन्न झाला. विवाहानंतर नवरी (Bride) सासरी पोहोचली. पण अचानक नवरीची तब्येत एवढी बिघडली की, गृहप्रवेशाआधीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. बिहारच्या नवादा परिसरातील रहिवासी गोपाल पंडित यांची मुलगी आरती हीचं लग्न हे सोहसराय बंधु बाजारमधील मनोज पंडित यांचा मुलगा विकासबरोबर झालं. त्यावेळी सर्वकाही ठिक होतं. त्यानंतर लग्नानंतर नव्या नवरीला घरी आणण्याची तयारी सुरू झाली. तिच्या स्वागतासाठी सर्वजण तयार होते.
गृहप्रवेशाआधीच नवरीची अचानक तब्येत बिघडली आणि सर्वांच्याच आनंदावर विरजण पडलं. नवरीला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नवरीचा अचानक अशाप्रकारे मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबामध्ये कोरोनाच्या शंकेने भीतीचं वातवरण निर्माण झालं. पण नवरीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. आरतीच्या भावाने लग्नाच्या दिवशी तिच्या पोटात दुखत होतं. तिला उलटी देखील झाली होती. पण सगळेच लग्नाच्या घाईत होते. त्यामुळे कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पण सासरी पोहोचताच तिची तब्येत जास्त बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण; लग्नसोडून गाठावं लागलं पोलीस स्टेशन अन्...
वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे लग्न मंडपाऐवजी त्याला थेट पोलीस ठाणे गाठावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात ही घटना घडली आहे. रामपुरामधील एका नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वरात निघण्यापुर्वी नवरदेव घोड्यावर बसून कुलदेवतेचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. मात्र त्या गल्लीत एका घरात शोकाकूल वातावरण होतं. शोकाकूल वातावरणात घरासमोरून नवरदेव जात असल्यामुळे त्यांना आवडले नाही. त्यामुळे नवरदेव असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी रोखले. आमचे कुटुंब दु:खात असताना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. वादाचं रूपांतर हे पुढे हाणामारीत झाले. मुकेश यादव आणि चंदन यादव यांनी नवरदेवाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.