ऑनलाइन लोकमत
मालापूरम (केरळ), दि. ३ - देशभरात असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच केरळमधील मालापूरम येथील एका मशिदीमध्ये हिंदू शहिदासाठी दररोज नमाज अदा केली जात आहे. १८ व्या शतकातील युद्धात शहीद झालेल्या एका हिंदू तरुणाला या मशिदीमध्ये दफन करण्यात आले आहे.
कोझिकोडमध्ये २९० वर्षांपूर्वी झालेल्या लढाईत कुनहेलू हे हिंदू तरुण शहीद झाले होते. जमेरिन शासनाविरोधात स्थानिक मुस्लिम तरुणांनी सशस्त्र लढा दिला होता व लढ्यात कुनहेलूदेखील सहभागी होते. या लढ्यात एकूण ४३ जणांना वीरमरण आले होते. नांबीने परिसरातील मशिदींमध्ये आग लावल्याने स्थानिक मुस्लिमांना परिसरातून पळ काढावा लागला होता. काही काळाने या वादावर तोडगा निघाले व स्थानिक मुसलमान पुन्हा परिसरात परतले होते. त्यानंतर जमेरिनविरोधातील लढाईत शहीद झालेल्यांसाठी नमाज अदा करण्याची परंपरा आहे. कुलहेनू यांना परिसरातील जामा मशिदीमध्ये दफन करण्यात आले होते. आजही या मशिदीमध्ये कुलहेनू यांच्यासाठी नमाज अदा केली जाते. तसेच ईद व अन्य सणासुदीच्या काळात कुलहेनू यांच्या वंशजांनाही मशिदीमध्ये बोलवले जाते. हिंदू मुस्लिम एकोप्याचे प्रतिकच या निमित्ताने बघायला मिळते असे स्थानिकांचे म्हणणे आहे.