लखनौ: उत्तर प्रदेशातील लखनौच्या लुलू मॉलमध्ये (LuLu Mall)झालेल्या नमाजामुळे वाद वाढत चालला आहे. हिंदू संघटना अखिल भारत हिंदू महासभेने लुलू मॉलमध्ये सुंदरकांड कार्यक्रम करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा लुलू मॉल आणि नमाजाचा नेमका वाद काय आहे.?
नेमका काय वाद आहे?उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लुलू मॉल सुरू होऊन एक आठवडाही झालेला नाही, तोच एक वाद सुरू झाला आहे. वादाचे कारण म्हणजे एकापाठोपाठ एक दोन व्हिडिओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये लुलू मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर काही लोक नमाज अदा करताना दिसत होते. या व्हिडिओवरून गदारोळ झाला आहे. हिंदू महासभेसोबतच अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी हे थांबवावे अन्यथा मॉलमध्ये हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण करू, असा इशारा दिला आहे. दरम्यान, मॉल व्यवस्थापनाने दावा केला की, त्यांचा नमाज अदा करणाऱ्या लोकांशी काहीही संबंध नाही, म्हणून त्यांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आणखी एक व्हिडिओ समोर आलाहिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी या घटनेला 24 तासही उलटले नसताना आणखी एक व्हिडिओ जारी केला. त्यात दुसऱ्यांदा मॉलमध्ये नमाज अदा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी व्हिडिओमध्ये 2 लोक मॉलमध्ये नमाज अदा करताना दिसत आहेत. शिशिर चतुर्वेदी यांनी दावा केला की, हा मॉल एका खास उद्देशाने बांधण्यात आला आहे. शिशिर चतुर्वेदी यांनी आरोप केला आहे की मॉलमधील 80 टक्के कर्मचारी मुस्लिम आहेत आणि केवळ 20 टक्के हिंदू आहेत. हिंदूंमध्ये फक्त हिंदू मुलींना कामावर ठेवण्यात आले आहे. पण, मॉल व्यवस्थापनाने हा आरोप फेटाळला आहे.
अशी घटना पुन्हा घडणार नाहीदरम्यान, मॉलचे व्यवस्थापक कर्मचार्यांची यादी घेऊन शिशिर चतुर्वेदी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी केलेला आरोप खोटा असल्याचे सांगितले. पण शिशिर चतुर्वेदी यांचा त्यांच्या यादीवर विश्वास नाही. सध्या लुलू मॉलचे जीएम चतुर्वेदींच्या घरी पोहोचले. त्यांनी अशी घटना पुन्हा घडणार नाही आणि दोषी पकडले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे सध्या शिशिर चतुर्वेदी यांनी लुलू मॉलमधील सुंदरकांड पठणाचा आग्रह काही काळासाठी पुढे ढकलला आहे.