भ्रष्टाचारासाठी ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलविले, राहुल गांधींचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 07:56 PM2018-10-20T19:56:30+5:302018-10-20T19:56:59+5:30
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
- बी. संदेश
आदिलाबाद - तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत. येथील ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलवून कालेश्वरम प्रोजेक्ट असे रिडिझाईन करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
आदिलाबाद जिल्ह्यातील भैसा येथे शनिवारी काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डिसेंबरमध्ये तेलंगणा विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच्या प्रचार सभेसाठी राहुल गांधींनी तेलंगणा दौरा केला. ते म्हणाले, ३८ हजार कोटींच्या कामाचे रिडिझायनिंग करून एक लाख कोटी रुपये करण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी आपल्या नातेवाईकांसाठी भ्रष्टाचार केला. दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे मुख्यमंत्री नुकसान करीत आहे.
यूपीए सरकार आल्यास जल, जंगल, जमीन कायदा आणून जमीन अधिग्रहण कायदा आणला जाईल. देशात व तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यावर आदिवासी बिल आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्षांनी यावेळी दिली. हिंदुस्थानच्या चौकीदाराने चोरी केली असा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. अनिल अंंबानी यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी, महेश्वरा रेड्डी, विजय शांती, डी.के. अरुणा, सविता इंद्रा रेड्डी, रामचंद्र रेड्डी, नारायणराव पाटील, साजीद खान, रामराव पाटील आदी उपस्थित होते.
कर्जमाफीचे आश्वासन
तेलंगणातील शेतक-यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ केले जाईल, बेरोजगारांसाठी काँग्रेस रात्रंदिवस प्रयत्न करेल, बेरोजगारांना तीन हजार रुपये दिले जाईल आदी आश्वासने यावेळी राहुल गांधींनी दिली.