भोपाळ: काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने राजधानी भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्टेशनचे(Habibganj Police Station) नाव बदलले होते. हबीबगंज रेल्वे स्टेशनला जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले रेल्वे स्थानक बनवून राज्य सरकारने भोपाळच्या गोंड राणी कमलापतीच्या नावावरुन स्टेशनचे नामकरण केले होते. त्यानंतर आता हबीबगंज पोलिस स्टेशनचे नावही बदलण्याची तयारी सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या कमलापती रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले होते. या स्टेशनचे आधीचे नाव हबीबगंज रेल्वे स्टेशन होते. भोपाळमधील या स्टेशनशिवाय याच भागातील एका पोलिस स्टेशनचे नावही हबीबगंज पोलिस स्टेशन आहे.
रेल्वे स्टेशनचे नाव बदल्यानंतर आता या पोलिस स्टेशनच्या नावावरही काही संघटना आक्षेप घेतला आहे. या सर्व संघटनांनी या पोलिस स्टेशनचेही नाव बदलण्यासाठी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना निवेदन दिले आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारले असता त्यांनी निवेदनाला दुजोरा देत या पोलिस ठाण्याचे नामांतर करण्याचाही विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे आता या पोलिस स्टेशनचे नावही लवकरच बदलले जाणार आहे.
काय आहे हबीबगंज नावाचा इतिहास ?असे म्हणतात की, नवाबाच्या काळात हबीब मियाँ नावाचे एक व्यक्ती या परिसरात राहत होते. त्यांनी आपली जमीन रेल्वे स्टेशनला दिली होती. त्यानंतर या भागाचे नाव हबीबगंज पडले. त्यानंतर स्टेशन आणि पोलिस स्टेशनलाही हबीबगंज असे नाव देण्यात आले. मात्र, आता हबीबगंज स्थानकाचे नाव बदलल्यानंतर हबीबगंज पोलीस ठाण्याचे नावही बदलले जाणार आहे.