नाशिक : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस असताना पक्ष नेतृत्वाने जयंत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी दिलीप खैरे, अर्जून टिळे, संजय खैरनार, महेश भामरे, सोमनाथ बोराडे, देवांग जानी, छबू नागरे यांच्यात रस्सीखेच होती; परंतु यांच्यापैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने पक्षापुढे पेच निर्माण झाला होता. अखेर पक्षश्रेष्ठींनी विद्यमान विधान परिषद आमदार जयंत जाधव यांचे नाव निश्चित केले. आमदार जाधव यांनी शहराच्यादृष्टीने विधान परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न, कामांचा सातत्याने केलेला पाठपुरावा आणि स्थानिक पातळीवर असलेले त्यांचे संबंध आणि कामाचा अनुभव या जोरावर त्यांची शराध्यक्षपदावर वर्णी लागली असल्याचे समजते. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही जाधव यांच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी अनेक मातब्बरांनी दावा केला होता. त्यादृष्टीने त्यांनी तयारीदेखील चालविली होती; परंतु जनसंपर्क, प्रतिमा तसेच शहराचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता म्हणून पक्षश्रेष्ठींनी जाधव यांना पसंती दिल्याचे समजते. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचेही कळते.
राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी जयंत जाधव यांचे नाव निश्चित
By admin | Published: April 26, 2015 10:20 PM