नवी दिल्ली: दूरध्वनी करणाऱ्याचे नाव तो ज्याच्याशी बोलत आहे त्या व्यक्तीच्या मोबाइल स्क्रीनवर दिसण्यासाठी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राय) नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे मोबाइल स्क्रीनवर नाव दर्शविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध ॲपची गरज भविष्यात उरणार नाही.
हे तंत्रज्ञान विकसित करण्याची सूचना केंद्रीय दूरसंचार खात्याकडून आम्हाला करण्यात आली होती, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष पी. डी. वाघेला यांनी दिली. दूरसंचार खात्याने आखून दिलेल्या नियमांच्या कक्षेत राहून तसेच दूरसंचार कंपन्यांनी नोंदविलेल्या केवायसीचा आधार घेऊन नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात येईल.
तंत्रज्ञान असेल अधिक पारदर्शक
दूरध्वनी करणाऱ्यांची नावे मोबाइलच्या स्क्रीनवर दर्शविणाऱ्या काही ॲपपेक्षा ट्रायचे नवे तंत्रज्ञान अधिक उत्तम व पारदर्शक असेल. ट्रायच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे स्वत:च्या मर्जीवर अवलंबून असेल की, सर्वांनाच त्याचा वापर करावा लागेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. - पी. डी. वाघेला, अध्यक्ष, ट्राय
दोन महिन्यांत हालचाली
ते म्हणाले, नवे तंत्रज्ञान तयार करण्याकरिता येत्या दोन महिन्यांत हालचाली सुरू करण्यात येतील. प्रत्येकाने केवायसीमध्ये नोंदविलेले नावच मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. दूरध्वनी करणाऱ्याचे नाव सध्या काही ॲपद्वारे मोबाइल स्क्रीनवर झळकते. मात्र ट्रायनेच या कामासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले तर अशा ॲपची गरजच भासणार नाही. (वृत्तसंस्था)