मुंबई- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमावरून सुरू असलेला वाद काही केल्या थांबत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून रोज नवनवीन कारणामुळे सिनेमा चर्चेत आहे. 'पद्मावती' सिनेमाच्या नावातून 'i' काढण्याबाबत सेन्सॉर बोर्डाने दिलेली सूचना निर्मात्यांनी मान्य केली, पण 'आय' अक्षर काढून या नावात आता आणखी एक अक्षर वाढवण्यात आलं आहे.
पद्मावत सिनेमाच्या ऑफिशियल ट्विटर हँडल पाहिलं असता, 'पद्मावत'च्या नावात 'a' हे अक्षर वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच 'Padmavat' ऐवजी 'Padmaavat' असं नाव देण्यात आलं आहे. 'Padmavati' पासून सुरु झालेला या टायटलचा प्रवास व्हाया 'Padmavat' आता 'Padmaavat' वर पोहचला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सिनेमात सेन्सॉर कोर्डाने 300 कट्स सुचविल्याचं समोर आलं होतं पण या वृत्ताला नकार देत फक्त पाच कट्स सुचविल्याचं स्पष्टीकरण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिलं. 'निर्मात्यांनी फक्त पाच बदलांसह पद्मावत सिनेमा जमा केला असून त्याला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे', असं प्रसून जोशी यांनी म्हंटलं.
25 जानेवारीला पद्मावत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय पण अजूनही काही ठिकाणी सिनेमला विरोध आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'पद्मावत' प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला. राजपूत संघटना करणी सेनेनेही 'पद्मावत' प्रदर्शित केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी दिली आहे.
'पद्मावती'ऐवजी 'पद्मावत'केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत. सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्रदेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती.
सूचवलेले बदल सिनेमाचं नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा.