वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून संकटमोचन मंदिराचे महंत व प्राध्यापक विश्वंभरनाथ मिश्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येण्याची शक्यता आहे. विश्वंभरनाथ मिश्रा यांना सपा आणि बसपाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.विश्वंभरनाथ मिश्रा हे केवळ संकटमोचन मंदिराचे प्रमुख पुजारीच नसून, ते बनारस हिंदू विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापकही आहेत. वाराणसीचे मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असे त्यांना मानले जाते. त्यामुळे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनावर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तरुणांवर असे शिक्के मारणे योग्य नाही. आपण सारे भारतातच जन्मलो आहोत, असे ते म्हणाले होते.गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत अतिशय आग्रही असलेल्या मिश्रा यांनी गेल्या पाच वर्षांत वाराणसीचा विकास व गंगा नदीची स्वच्छता यांचे फारसे काम न झाल्याची तक्रार मध्यंतरी केली होती, तसेच वाराणसीमधील प्रदूषण तर पाच वर्षांत वाढले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. वाराणसीमध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांनाच पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात उभे करावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेसने अद्याप त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे सांगण्यात येते.मिश्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मीही अशी चर्चा ऐकतच आहे. पण काँग्रेस नेत्यांशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. (वृत्तसंस्था)तोगडियाही लढणार?विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा आधीच केली आहे. तसेच तामिळनाडूतील १0१ शेतकरीही वाराणसीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधानांपुढे मांडणे, हा त्यामागील हेतू आहे. गेल्या वेळी मोदी यांच्याविरोधात अरविंद केजरीवाल उभे राहिले होते. पण मोदी पावणेचार लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.