नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीसारखी नवी कर प्रणाली आणली. या कर प्रणालीमुळे अनेक जण प्रभावित झाले. मोदी सरकारनं लागू केलेल्या वस्तू आणि सेवा करा (गुड्स अँड सर्व्हिसेस् टॅक्स)मुळे लोक किती प्रभावित झाले, याचं उत्तम उदाहरण सूरतमध्ये समोर आलं आहे. सूरतमधल्या एका महिलेने तिन्ही मुलींची नावेच GST च्या आद्याक्षरांवरून ठेवल्यानं ती सध्या चर्चेत आली आहे. गारवी, सांची आणि तारवी अशी मुलींची नावं तिने ठेवली असून, तिघींचीही जी, एस, टी या आद्याक्षरांनी नावं सुरू होतायत. सूरतच्या कंचन पटेल ही महिला म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीएसटी म्हणजेच एक टॅक्स- एक देश या कर प्रणालीमुळे आम्ही प्रेरित झालो आहोत. त्यामुळेच आम्ही जीएसटीच्या आद्याक्षरांवरून मुलींचं नामकरण केलं आहे. कंचन पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच तीन मुलींना जन्म दिला. त्यानंतर त्यांनी त्या मुलींचं नामकरण केलं आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी राजस्थानमध्ये जन्माला आलेल्या मुलीचं नाव 'जीएसटी' ठेवण्यात आलं होतं. तसेच छत्तीसगडच्या वैकुंठपूरमध्येही 1 जुलैला जन्माला आलेल्या मुलीचं नाव जीएसटी ठेवण्यात आलं होतं. याच दिवशी मध्यरात्री देशभरात जीएसटी लागू झाला होता.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी लागू करण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राजस्थानमध्ये एका मुलाने जन्म घेतला. देशातील करप्रणालीत झालेल्या क्रांतिकारी बदलाच्या ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आनंदीत झालेल्या आईने त्याचे नाव जीएसटी ठेवण्याचा निर्णय घेतला.
राजस्थानमधील ब्यावर येथे काल मध्यरात्री बरोब्बर 12 वाजून 2 मिनिटांनी एका मुलाने जन्म घेतला. हा मुलगा आणि त्याच्या आईचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आई आनंदीत दिसत आहे. तसेच या मुलाचे नाव जीएसटी असे ठेवत आईने मुलाचा जन्म अविस्मरणीय बनवला आहे.
देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करप्रणाली अखेर कालपासून लागू झाली. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती.