ऑनलाइन लोकमत
कुपवाडा, दि. ३० - कुरकुरे, लेज आणि पंजाबी तडका हे अनेकांचे आवडीचे खाद्यपदार्थ. पण याच खाद्यपदार्थांवरुन माणसांची नावे असतील तर. कोणीही आपल्या मुलांची अशी नावे ठेवण्याचे धाडस करणार नाही. पण कुपवाडयामध्ये रेशनकार्ड कार्यालयाने माणसांना चक्क कुरकुरे, लेज, पंजाबी तडका ही नावे दिली आहेत.
उत्तरकाश्मिरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवारामध्ये असेच एक गंमतीशीर रेशनकार्ड समोर आले आहे. ज्यावर कुरकुरे, लेज आणि पंजाबी तडकाला कुटुंबप्रमुखाची मुले म्हणून दाखवले आहे. या गंमतीशीर रेशनकार्डाबद्दल जम्मू-काश्मिरच्या सीएपीडीवर फक्त टीकाच होत नसून, या रेशनकार्डाची माहिती फेसबुक, व्हॉटस अॅप या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
कुपवाडामधील सीएपीडी खात्याने हंडवारामध्ये रहाणा-या व्यक्तीच्या नावे हे रेशनकार्ड जारी केले आहे. अली मोहोम्मद एस/ओ वाली मोहोम्मद, पत्नी मारीअम ४० आणि त्यांची तीन मुले कुरकुरे १०, लेज ८ आणि पंजाबी तडका ६, पत्ता - विलगाम हंडवारा असे या रेशनकार्डावर छापले आहे.
सीएपीडीने पहिल्यांदा अशी चूक केलेली नाही यापूर्वीही त्यांनी अशाच चुका केल्या आहेत असे कुपवाडामधील एका स्थानिकाने सांगितले. उत्तरकाश्मिरमध्ये लोकांनी सीएपीडीकडून होणा-या गंभीर चुकांबद्दल निदर्शनेही केली आहेत.