नवी दिल्ली : ऐपत असूनही मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची (विलफुल डिफॉल्टर) यादी तयार करून त्यांची नावे सार्वजनिक करण्याची तयारी सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कर्जांच्या प्रकरणी न्यायालयाबाहेर समझोता करण्याचे प्रयत्नही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना राजन म्हणाले की, कर्ज घेऊन ते चुकते न करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर केली जाणार नाहीत. मोठ्या कर्जबुडव्यांसोबत त्यांची नावे जाहीर करणे योग्य ठरणार नाही. विशेषत: जे लोक क्रेडिट कार्डाचे बिल देण्याचे विसरून गेले आहेत त्यांची नावे जाहीर करणे बरोबर ठरणार नाही, असे झाल्यास लोक क्रेडिट कार्डाचा वापर करणेच सोडून देतील.राजन म्हणाले की, रिझर्व्ह बँक ही नियामक संस्था असली तरी चुकीचे काम करणाऱ्यांना वाचविण्याचा आमचा हेतू नाही. उलट अशा लोकांची नावे जाहीर केल्याने आम्ही खुश होऊ. खरे तर या दिशेने आम्ही काम करीत आहोत त्यांची नावे सर्वांपर्यंत सहज पोहोचवावीत, अशी आमची इच्छा आहे. अनेक लोकांविरुद्ध पूर्वीपासूनच खटले सुरू आहेत. ती नावे लोकांना माहीतच आहेत. त्यांचाही या यादीत समावेश असेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)> प्रकरण सर्वोच्च न्यायालयातसध्या पंजाब नॅशनल बँक मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांची नावे वेळोवेळी जाहीर करीत आहे. दुसऱ्या बँकांनी आतापर्यंत ही प्रणाली अवलंबिलेली नाही. राजन यांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात अशा मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली होती आणि न्यायालयाने ती नावे जाहीर करू नये, अशी विनंती बँकेला केली होती. सर्वोच्च न्यायालयात मात्र ही नावे जाहीर करण्याच्या बाजूने आहे.अनेक प्रकल्प सुरू न झाल्याने भारतीय बँकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण वाढत चालले आहे. मंदीमुळे अनेक कंपन्यांच्या व्यवसायात घट झाली आहे. त्यांच्याविरुद्ध कर्जाचे ओझे वाढत चालले आहे.