नवी दिल्ली : ‘आधार’ नसल्याच्या कारणास्तव कोणाचेही नावन रेशन कार्डवरून काढू नये, असे केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना कळविले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.
रेशन दुकानांतून धान्य देताना कार्डधारकाचे वा त्या कार्डावरील व्यक्तींचे नाव आधारशी लिंक आहे का, हे तपासले जाते. काही जणांकडे आधार कार्ड नसल्याने वा त्यांनी ते रेशन कार्डशी जोडले नसल्याने त्यांना रेशन दुकानांतून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.पासवान म्हणाले की, आधारशी रेशन कार्ड लिंक नसल्यास संबंधित व्यक्तीकडून अन्य पुरावे घेता येतील. मात्र, आधार नसल्याच्या कारणास्तव कोणालाही स्वस्त धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही वा त्याचे नाव रेशन कार्डवरून काढता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दुकानांमध्ये व्यवस्था
देशात रेशनची ५ लाख ३५ हजार दुकाने असून, त्यापैकी ४ लाख ५८ हजार दुकानांमध्ये आधार व रेशन कार्ड लिंक आहे का, हे पाहता येते, असे पासवान म्हणाले.