बेंगळुरू - भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी रस्त्यांचे नामकरण मुस्लीम नावांवरून करण्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, मुस्लीम बहूल भागांत बिगर मुस्लीम महापुरुषांच्या नावावर विचार करावा, असा सल्ला बेंगळुरू महापालिकेला दिला आहे. ते म्हणाले, देशात बिगर मुस्लीम महापुरुष आणि राष्ट्रभक्तांची कमी नाही आणि त्यांच्याच नावाने रस्त्यांचे नामकरण व्हायला हवे.
एका कन्नड वृत्तपत्रत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर दक्षिण बेगळुरूचे खासदार तेजस्वी यांनी बृहत बेंगळुरू महानगरपालिकेचे (बीबीएमपी) आयुक्त एन मंजूनाथ प्रसाद यांना पत्र लिहिले आहे. यात, बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचे नामकरण व्हायला हवे, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे. तसेच बीबीएमपीने केवळ मुस्लीम नावेच सुचवली आहेत, असेही ते म्हणाले.
'द्विराष्ट्र सिद्धांतासारखा विचार'खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, ‘मुस्लीम बहूल भागांत रस्त्यांचे नामकरण मुस्लिमांच्या नावाने करणे, हा द्विराष्ट्र सिद्धांतासारखा विचार आहे. ज्या प्रकारे मुस्लीम लीगने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या मतदार याद्यांची मागणी केली होती, अगदी त्याच प्रकारचा हा सांप्रदायिक विचार आहे. या निर्णयावर आयुक्तांनी पुनर्विचार करावा.'
करीम खान यांच्या नावावरून सुरू झाला वाद -तेजस्वी यांनी, प्रसाद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘मी आपल्याला यादीमध्ये तत्काळ बदल करण्याची आणि नावांसंदर्भात व्यापक चर्चा करण्याची विनंती करतो.’ यासंदर्भात अद्याप बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. यापूर्वी, बीबीएमपीने शहरातील इंदिरानगरमधील 100 फुट रुंद रस्त्याचे नाव लोक कलेचे तज्ज्ञ डॉ. एस के करीम खान यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, वाद निर्माण झाला होता.
वाजपेयींच्या नावाने नामकरण करण्याची मागणी - भाजपचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या रस्त्याचे नामकरण करण्याची माग करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने 2006 मध्ये डॉ. खान यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.