मुंबई - देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तर प्रदेशातील यशाबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत, हेच सांगायचं आहे. त्यासाठी, काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकारी आज होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशसारख्या खाली मैदानात मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवली. त्यामुळे, त्यांच्या कामाचं कौतूक करायचं आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या बैठकीत मांडायचा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी चांगला स्कोप कशाप्रकारे मिळवता येईल, याबाबतही चर्चा होणार आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं ह्रदय आहेत, कार्यकर्त्यांच ह्रदय आहेत. देशातून गांधी परिवाराला मोठी अपेक्षा आहे, आज किंवा उद्या देशात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल. 2024 मध्ये देशाच्या सत्तेत काँग्रेसच पाहायला मिळेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, एकीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी निकालानंतर नाराजी व्यक्त केली असून दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसकडून युपीतील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगत अभिनंदनाचा ठराव करण्याचे ठरवल्याचे याचीही सर्वत्र चर्चा होत आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंनीही दिला राजीनामा
सोनिया गांधींच्या आदेशानंतर गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी तत्काळ राजीनामा दिला, तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी निकालाच्या दिवशीच १० मार्चला राजीनामा देऊ केला होता. या राज्यांमध्ये नव्याने काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे. अजय कुमार लल्लू हे उत्तर प्रदेशचे तर एन. लोकेन सिंह हे मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
प्रियंका गांधी यांनीही सोमवारी एक बैठक बाेलाविली हाेती. त्यात उत्तर प्रदेशातील पराभवानंतर अजय कुमार लल्लू यांना पक्षातील नेत्यांनी लक्ष्य केले. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील नेत्यांनी विराेध केला हाेता. त्याच प्रकारे पंजाबमध्येही चरणजीतसिंह चन्नी आणि सिद्धू यांच्यावरही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.