मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे. अदानींनी घेतलेल्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेसने थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटले आहे. तसेच, अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकार आणि गुजराती उद्योजकांवर निशाणा साधला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे मुख्यालय मुंबईहून अहमदाबादला हलविल्याबद्दल नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इंस्टीट्यूट गुजरातला नेले जात आहेत. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून काँग्रेसला डिवचण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. याबद्दल नाना पटोलेंना विचारले असता, मी सामना वाचत नाही, सामनावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हटले आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन, काँग्रेस आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सचिन सावंत यानीही साधला निशाणा
"मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असेच गुजरातला नेले गेले," असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.