नवी दिल्ली : भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे, तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या ५० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठाही ही सौदी कंपनी करणार आहे.‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स’ नावाचा हा तीन अब्ज रुपये खर्चाचा प्रकल्प इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या मिळून उभारत आहेत. सौदी अरबस्तानचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधनमंत्री खलिद अल फलिह यांनी सौदी आरामकोच्या वतीने या प्रकल्पातील सहभागासंबंधीचा सामंजस्य करार केला.अल फलिह म्हणाले की, या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के भागीदारीचे भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांचे दोन गट असतील. सुरुवातीस सौदी आरामको ५० टक्के विदेशी गुंतवणूकदाराचा वाटा उचलेल व कालांतराने त्यात इतरही इच्छुक गुंतवणूकदारांना सहभागी करून घेऊ शकेल. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरू आहे व त्यांचा जमीन संपादनास विरोध आहे, असे लक्षात आणून दिल्यावर आरामको कंपनीचे अध्यक्ष अमिन एस. नासेर म्हणाले की, आमचे भारतीय भागीदार हा विषय यशस्वीपणे हाताळतील, याची आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पाची दररोज १.२ दशलक्ष बॅरेल (वर्षाला ६० दशलक्ष टन) तेल शुद्धिकरणाची व वर्षाला १८ दशलक्ष टन अन्य पेट्रो उत्पादनांचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. यापैकी ५० टक्के कच्च्या तेलाचा खात्रीशीर पुरवठा करण्याकेरीज सौदी आरामको अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देईल, असेही अल फलिह यांनी सांगितले. सौदी आरामकोचे पत मानांकन उच्च श्रेणीतील असल्याने भांडवल उभारणी तुलनेने कमी खर्चात होऊ शकेल, असेही ते म्हणाले. भारतात पेट्रोलियम आणि पेट्रो उत्पादनांच्या किरकोळ विक्रीच्या बाजारपेठेतही उतरण्याचा विचार असल्याचे अल फलिह म्हणाले. मात्र यासंदर्भात नियामक व्यवस्थेचे नियम तपासून पाहावे लागतील, असे भारताचे ऊर्जामंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.>रिफाईनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यास प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही. केंद्र सरकारला तसे कळवून प्रकल्प रद्द करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिले होते. मात्र, आज दिल्लीत अरामको कंपनीशी करार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केला आहे.- अशोक वालम, अध्यक्ष, रिफाईनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना>असा असेल हा प्रकल्पमुख्य तेल शुद्धिकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.तेथून १५ किमी अंतरावरएक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.एकूण अपेक्षितखर्च तीन अब्ज रुपये.वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.अपेक्षित उभारणी सन२०२५ पर्यंत.
नाणार प्रकल्पासाठी निम्मा पैसा सौदीचा, सौदी आरामको कच्चे तेलही पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 6:28 AM