भोपाळ : एक काळ असा होता की, चंबळ खोऱ्यातील मुरैना हे नाव ऐकलं की मनात बंदुका, दरोडे असे भयावह चित्र उमटायचे; पण काळानुसार इथे बरेच काही बदलले आहे. नंदिनी अग्रवाल ही तरुणी या बदलाचे एक भक्कम उदाहरण ठरले आहे. मध्य प्रदेशच्या मुरैना या छोट्याशा जिल्ह्याची मुलगी नंदिनी २०२१ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत संपूर्ण भारतात ८३,००० उमेदवारांमधून प्रथम आली. अवघ्या १९ वर्षे ३३० दिवसांच्या वयात ती सीए झाली. अलीकडेच तिचे नाव जगातील सर्वांत तरुण महिला सीए म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले.
थेट दुसऱ्या इयत्तेत...n नंदिनीचे वडील नरेश कर सल्लागार व आई डिंपल गृहिणी आहेत. लहानपणापासूनच हुशार असलेल्या नंदिनीच्या शिक्षणासाठी पालकांनी कोणतीही कसर सोडली नाही. n ज्या वयात मुलांना हात धरून बाराखडी शिकवली जाते त्या वयात तिने हिंदी आणि इंग्रजी वाचायला-लिहायला सुरुवात केली, यावरून तिच्या प्रतिभेचा अंदाज येतो. n हे पाहून शाळा व्यवस्थापनाने थेट दुसऱ्या इयत्तेत दाखल केले आणि भाऊ सचिनसोबत तिचे शिक्षण सुरू झाले.
११ वीत स्वप्न : मी ११ वीत असताना एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक आमच्या शाळेत आले. तेव्हा सर्वजण त्यांना खूप आदर देत होते. तेव्हापासून एखादा विक्रम रचायचा जो तोडणे कठीण असेल हे स्वप्न पाहिले. अखेर आता स्वप्न पूर्ण झाले. १२ ते १५ तासांच्या अभ्यासाचा क्रम मी कधीच मोडला नाही. ही शिस्त कामी आली. - नंदिनी
फक्त ऑनलाइन कोचिंग नंदिनीने १३ व्या वर्षी १० वी आणि १५ व्या वर्षी १२ वी उत्तीर्ण केली. सोशल मीडिया व मोबाइलपासूनही अंतर राखले. सीएच्या अभ्यासासाठी कोणतेही थेट कोचिंग घेतले नाही. कमी वयात सीए झाल्यामुळे अप्रेंटिसशिपसाठी खूप अडचणी आल्या, पण यामुळे असे अडथळे पार करण्याचा अधिक दृढनिश्चय केला. सध्या ती मुंबईत इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला आहे.