कर्नाटक सरकारने दूध ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. तेथील सरकारी दूध उत्पादक संघ नंदिनी दुधाच्या दरात मोठी वाढ केली आहे. अचानक चार रुपयांनी प्रति लीटर दुधाच्या दरात वाढ झाली आहे. नवीन दर १ एप्रिलपासून सुरु होणार आहेत.
कर्नाटक राज्याचे पशुपालन मंत्री के वेंकटेश यांनी या दरवाढीची घोषणा केली आहे. दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही दरवाढ केल्याचे कारण त्यांनी दिले आहे. दुधाच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच दुध उत्पादनाचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन दुधाची आणि दह्याची किंमत वाढविण्यात येत असल्याचे वेंकटेश यांनी स्पष्ट केले.
वाढलेल्या दराची झळ खरेदीदारांच्या खिशावर पडणार असली तरी त्याचा फायदा दुग्धउत्पादक शेतकरी आणि त्याच्याशी संबंधीत लोकांना होणार आहे. तसेच जून २०२४ मध्ये नंदिनी दुधाच्या दरात २ रुपयांची प्रति लीटर वाढ करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे. आता नव्या दराने दूध आणि दह्याची विक्री केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.
अमूलने कर्नाटकमध्ये पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नंदिनीच्या दुधाचे दर कमी ठेवण्यात आले होते. परंतू महागाई वाढत चालल्याने व अमुलला टक्कर देण्यासाठी नंदिनी दुधाची उत्तर भारतातही विक्री केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे केल्यास नंदिनी दूध उत्तर भारतात अमूलला टक्कर देणार आहे.
एप्रिलपासून दूध आणि दह्याचे दर किती वाढणार?
टोन्ड दूध – ₹४६ प्रति लिटर (पूर्वी ₹४२)
एकसंध टोन्ड दूध - ₹४७ प्रति लिटर (पूर्वी ₹४३)
गाईचे दूध (हिरवे पॅकेट) - ₹५० प्रति लिटर (पूर्वी ₹४६)
शुभम दूध - ₹५२ प्रति लिटर (पूर्वी ₹४८)
दही - ₹५४ प्रति किलो (पूर्वी ₹५०)