ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरुन उचलबांगडी केल्याने सायरस मिस्त्री आक्रमक झाले आहेत. स्वतःची बाजू पटवून देण्यासाठी आता ते हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्यावर पलटवार करताना दिसत आहेत.
याचाच एक भाग म्हणजे मिस्त्री यांनी आता टाटा समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नॅनो कारवरुन रतन टाटा यांच्यावर निशाणा साधला आहे.
'टाटा समूहा'चा तोट्यात चाललेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'नॅनो' कारचा मुद्दा मांडत त्यांनी रतन टाटांवर अनेक आरोप केले आहेत. नॅना कारच्या उत्पादनामुळे कंपनीला कोणत्याही प्रकारचा नफा होत नव्हता. केवळ भावनिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद करु शकलो नाही. तर दुसरे कारण म्हणजे नॅनोचे उत्पादन थांबवले असते तर, इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी लागणा-या ग्लायडर्सचा पुरवठा बंद झाला असता, ज्यामध्ये टाटा यांची भागीदारी होती. केवळ भावनिक कारणांमुळे महत्त्वाच्या निर्णयापासून लांब ठेवण्यात आले, असा खळबळजनक आरोप मिस्त्री यांनी केला आहे.
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतःची बाजू मांडण्यासाठी मिस्त्री यांनी टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना ई-मेलद्वारे पाच पानांचे पत्र पाठवले. त्यातचे मिस्त्री यांनी हे आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. टाटा यांच्या अनाठायी लुडबुडीमुळे आपली अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती, असा गंभीर आरोप केला आहे.
सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५
ऑक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री 10 वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.