नॅनोसाठी 33 हजार कोटी दिले पण पंधरा दिवसात एकही नॅनो कार रस्त्यावर दिसली नाही - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 04:01 PM2017-11-03T16:01:30+5:302017-11-03T16:03:32+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे.
अहमदाबाद - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे. मागच्या काही दिवसांपासून ते सतत गुजरातचा दौरा करत आहेत. नवसर्जन यात्रेदरम्यान शुक्रवारी पारडीमध्ये सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी टाटा नॅनो प्रकल्पावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये आणला होता.
त्याच नॅनो प्रकल्पावरुन राहुलनी भाजपावर टीका केली. नॅनो प्रकल्पासाठी 33 हजार कोटी दिले पण मागच्या 10 ते 15 दिवसात मला एकही नॅनो कार रस्त्यावर धावताना दिसली नाही. गुरुवारीही एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी हाच मुद्दा उपस्थित करत गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शेतक-यांकडून जमिनी घेऊन उद्योजकांना दिल्या. त्याबरोबर पाणी आणि वीजही दिली. पण उद्योजकांनी कशाचीही परतफेड केली नाही. हेच गुजरातच्या विकासाचे मॉडेल आहे का ? असा सवाल राहुल यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात वर्षाला काही लाख नोक-या निर्माण होत आहेत असे राहुल म्हणाले.
दक्षिण गुजरातच्या तीनदिवसीय दौ-यावर असतानाही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून कठोर टीका केली होती. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असे सांगतानाच त्यांनी जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारचे जातीयवादी राजकारण व कॉर्पोरेटचे हितसंबंध जोपासण्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले होते. जागतिक बँकेच्या अहवालाबाबत ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी छोट्या व मध्यम व्यावसायिकांशी १० मिनिटे बोलावे व त्यांना विचारावे की, त्यांच्या व्यवसायात सुगमता आली आहे काय? संपूर्ण देश ओरडून सांगेल की, व्यवसायात सुगमता बिलकूल आलेली नाही. तुम्ही हे सगळे उद्ध्वस्त केले आहे. तुमच्या नोटाबंदी व जीएसटीने हे सगळे नष्ट केले आहे असे राहुल गांधी म्हणाले.