नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे दिल्लीत स्मारक उभारत काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने चालविला आहे. नरसिंहराव यांचे राजधानीत स्मारक उभारण्याच्या मागणीची दखल घेत केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत.गेल्याच महिन्यात नगर विकास मंत्रालयाने एकता स्थळ समाधी संकुलात राव यांचे स्मारक उभारण्यासंबंधी प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर केला आहे. मुक्त आर्थिक धोरणाचे शिल्पकार या नात्याने नरसिंहराव हे शासकीय सन्मानासाठी पात्र ठरतात असे रालोआ सरकारला वाटते. काँग्रेसनिष्ठ राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे स्मारक एकता स्थळ येथेच आहे. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी मतभेद असल्याच्या बातम्या त्या काळी प्रसिद्ध झाल्या होत्या. राजधानीत जागेची कमतरता पाहता संपुआ सरकारने २०१३ मध्ये नरसिंहराव यांचे स्वतंत्र स्मारक उभारण्याची मागणी फेटाळत त्याऐवजी ‘राष्ट्रीय स्मृती’ या अन्य स्मारके असलेल्या जागेवर स्मारक उभारावे असे सुचविले होते. नरसिंहराव हे तेलंगणामधील असून सध्या रालोआमधील घटक पक्ष असलेल्या देसम पार्टीने गेल्या आॅक्टोबरमध्ये दिल्लीत स्मारक उभारण्याची मागणी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत उभारणार नरसिंहराव यांचे स्मारक
By admin | Published: April 01, 2015 1:30 AM