नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर नव्या ४३ मंत्र्यांचा समावेश करून केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या चार नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे या खातेवाटपावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती आली असून, कोणाकडे कोणता पदभार दिला आहे, याचा घेतलेला आढावा. (narayan rane given responsibility of small and medium enterprises minister)
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या चार जणांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला खासदार रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, नवीन खातेवाटपानुसार रावसाहेब दानवे यांना बढती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणाला कोणते खाते मिळाले?
या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून नारायण राणे यांना महत्त्वाचे खाते मिळेल, असा कयास बांधला जात होता. नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात असून, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याचबरोबर डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री म्हणून मी शपथ घेतली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी मंत्री बनलो आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली.