नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणेंना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटकही केली. राणेंच्या अटकेनंतर पुन्हा भाजपा-शिवसेना वाद टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षाचे नेते आणि प्रवक्ते एकमेकांवर आरोप करत आहेत. आता, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनीही आजचा दिवस घटनात्मक इतिहासातील दु:खद दिवस असल्याचं म्हटलंय.
स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना, महाराष्ट्रात राजकीय विकृतीकरण पाहायला मिळाल्याचं म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व नियमांच्या विरोधात आहे, केवळ प्रोटोकॉलच्या, सभ्यतेच्याच नव्हे तर कायद्याच्याही. हीच खोली आहे, ज्यात महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या विकृतपणाचे प्रदर्शन केले जाईल. देशाच्या संवैधानिक इतिहासातील हा एक दुःखद दिवस आहे,' अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी नारायण राणेंच्या अटकेवर भाष्य केलं आहे.
आम्ही शेवट करू, शेलार यांचा इशारा
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारला बारामतीतील शहाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिला. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत, असेही त्यांनी म्हटले. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
भाजपला सत्तेची भूक अन् लालच
भाजपाने काहीही करुन महाराष्ट्रात सरकार बनविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच, देवेंद्र फडणवीस काही तासांसाठी मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळेच, महाराष्ट्रात लोकांमध्ये आक्रोश आहे, क्रोध आहे. दररोज तिसऱ्यादिवशी हे सांगण्यात येतंय की महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होणार आहे. दर तीन दिवसांनी भाजप-शिवसेना सरकार बनविणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. भाजपला सत्तेची भूख आणि लालच आहे. त्यामुळेच, नारायण राणेंना प्रमुखपद देण्यात आलंय, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.