मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणेंना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटकही केली आहे. राणेंच्या अटकेनंतर पुन्हा भाजपा-शिवसेना वाद टोकाला गेला आहे. भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्यानेच राणेंनी केंद्रात एवढं मोठं स्थान दिल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
भाजपाने काहीही करुन महाराष्ट्रात सरकार बनविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच, देवेंद्र फडणवीस काही तासांसाठी मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळेच, महाराष्ट्रात लोकांमध्ये आक्रोश आहे, क्रोध आहे. दररोज तिसऱ्यादिवशी हे सांगण्यात येतंय की महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होणार आहे. दर तीन दिवसांनी भाजप-शिवसेना सरकार बनविणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. भाजपला सत्तेची भूख आणि लालच आहे. त्यामुळेच, नारायण राणेंना प्रमुखपद देण्यात आलंय, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
2019 पासून 2021 पर्यंतचे त्यांचे वक्तव्य ऐकल्यास त्यांनी केवळ शिव्या दिल्या आहेत. चरित्रहनन आणि वैयक्तिक टीका टिपण्णी एवढंच केलंय. भाजपला मर्यादा नाही, संविधान आणि संवैधानिक पदाची मर्यादा भाजपा नेत्यांकडून राखली जात नाही. आपण सातत्याने मुख्यमंत्र्यांवर शिवसैनिकांवर टीका करत असाल, तर मर्यादा पाळणं केवळ सर्वसामान्य जनतेचंच काम नाही, असेही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंची अटक बेकायदेशीर, वकीलांचा दावा
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेविरोधात आम्ही योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी दादा मागू अशी माहिती नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी पुढे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की, एखाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, थेट अटक करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे नारायण राणेंची अटक बेकायदेशीर असल्याचं वकील अनिकेत निकम यांनी म्हटलं आहे.
अनिल परब यांची ऑडिओ क्लीप व्हायरल
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. यात अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसतात. त्यात कसलं अटक वॉरंट मागतायेत? पोलीस बळाचा वापर करून अटक करा असं ते सांगत असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. तर रत्नागिरी एसपी नारायण राणेंकडे गेले असता त्यांच्याकडे अटक वॉरंटची मागणी होत आहे. जोपर्यंत अटक वॉरंट दाखवत नाहीत तोवर अटकेला विरोध करू असा पवित्रा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतला आहे.