नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीव्र पडसाद उमटले. हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे, हनुमान चालिसा, कांदा, दूध, गद्दार, औकात अशा शब्दांनिशी राज्यातील मुद्यांवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकसभेतील वातावरण चांगलेच तापले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना खासदारांवर टीका करताना तुमची औकात नाही, अशा शब्दात प्रहार केला. त्यावरुन आता शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी बोचऱ्या शब्दात राणेंवर टीका केलीय.
नारायण राणेंच्या भाषणावरुन आता शिवसेना नेते आणि विरोधी पक्षातीली इतरही सदस्य आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करण्यात येणार का, असा सवालही आपने संसदेत विचारला आहे. तर, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही राणेंच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत बोचरी टीका केली. हे महाशय मंत्री आहेत, यांच्या भाषणावरुन या सरकारचा दर्जा कळतो, असे म्हणत प्रियंका चतुर्वैदींनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच, खासदार अरविंद सावंत यांनीही नारायण राणेंवर पटलवार केला. राणे लोकसभेत त्यांच्या उंचीप्रमाणे बोलले, वैचारिक उंचीप्रमाणे म्हणा हवं तर, असेही सावंत यांनी म्हटले. तसेच, भगौडे म्हंटल्यावर इतका राग का आला? मणिपूरच्या घटनेमुळे देशावर कलंक लागलाय. आजचा लोकसभेतील विषय गंभीर होता, त्या लोकांनी तो फरफटत नेला,असे म्हणत सावंत यांनी राणेंवर पलटवार केला, तर मोदी सरकारलाही लक्ष्य केलं.
दरम्यान, पावसाळी अधिवेशन आहे तर थोडाफार विजा आणि ढगांचा गडगडाट होणारच, असे म्हणत सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
काय घडला प्रकार
अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) वर हल्ला केला होता. सभागृहातील समोर आलेल्या एका व्हिडीओनुसार राणेंनी ठाकरे गटासाठी ‘औकात’ या शब्दाचा उच्चार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, असे नारायण राणे म्हणाले होते. या दरम्यान, अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनीही नारायण राणे यांना रोखत वैयक्तिक टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी राणेंना दोन वेळा ताकीद दिली. तसेच खाली बसण्यास सांगितले.