शेतकऱ्याची नेत्रदिपक भरारी! 700 झाडांच्या बागेतून दरवर्षी मिळतंय 30 लाख रूपयांचं उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:58 PM2022-12-09T14:58:58+5:302022-12-09T14:59:42+5:30
मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
शाजापूर : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तरूणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्याने आवळा सारखी औषधी शेती करून गरिबीवर मात केली. शेतकरी मनोज नरेलिया यांनी शेती हा एक फायदेशीर व्यवसाय असल्याचे दाखवून दिले आहे. आवळ्याच्या शेतीतून त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा नफा मिळत आहे. नरेलिया या शेतकऱ्याने 20 वर्षांपूर्वी सुनेरा गावाजवळ 15 एकर जमिनीत आवळ्याची बाग लावली होती, 5 वर्षानंतर या झाडांना फळे येऊ लागली. सध्या या बागेत जवळपास 700 झाडे आहेत, ज्यावर आवळ्याची फळे येतात. यंदाही आवळ्याचे बंपर उत्पादन झाले असून भरघोस नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
आवळा हे पीक नोव्हेंबर महिन्यात जवळजवळ तयार होते आणि डिसेंबरपर्यंत ते मोठ्या व्यापाऱ्यांमार्फत विकत घेऊन प्रसिद्ध आयुर्वेद औषध कंपन्यांपर्यंत पोहोचवले जाते. नरेलिया यांनी सांगितले की, पीक तयार होताच दरवर्षी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील व्यापारी शेतात येतात आणि संपूर्ण बागेचा व्यवहार करतात. साधारणपणे इथला आवळा यूपी आणि हरिद्वारला पुरवला जातो.
मेहनत कमी आणि नफा जास्त
नरेलिया या शेतकऱ्याने त्याच्या यशाचा मार्ग सांगताना म्हटले, आवळ्याची शेती करताना फारसा खर्च येत नाही. एकदा रोप लावले की फक्त त्याची काळजी घ्यावी लागते. फक्त पाणी आणि ठरावीक गोष्टींची काळजी आवश्यक असते. मात्र, इतर पिकांना जास्त श्रम आणि खर्च करावा लागतो. या बागेतून दरवर्षी 20 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु यावेळी देशातील इतर भागात आवळ्याचे अधिक उत्पादन झाल्याने भाव थोडा कमी आहे.
लक्षणीय बाब म्हणजे आवळा ही एक औषधी वनस्पती आहे. खरं तर कोरोना काळापासून आवळ्याची मागणी वाढली आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई यासह अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आगामी काळात देखील याची मागणी वाढेल अशी नरेलिया या शेतकऱ्याला अपेक्षा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"