Tomato Farmer Murder : आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या टोमॅटोला चांगला भाव असल्याने टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. पण इथे लाखोंचो टोमॅटो विकणाऱ्या शेतकऱ्याची हत्या झाल्याने एकच खळबळ माजली. नरेम राजशेखर रेड्डी (६२) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून बुधवारी ही घटना घडल्याचे समजते. मंगळवारी रात्री मृत शेतकरी गावात दूध विकण्यासाठी जात असताना त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी त्यांना थांबवून हात-पाय बांधून टॉवेलने गळा आवळून त्यांचा जीव घेतला.
दरम्यान, नरेम ज्या गावात दूध देण्यासाठी गेले होते तिथे आणखी एक शेतकरी दूध विकायला आला होता. त्या शेतकऱ्याच्या पत्नीने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिने सांगितले की, काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदीच्या बहाण्याने शेतात आले होते. पती गावी गेल्याचे मी सांगताच ते तिथून निघून गेले.
लाखोंचे टोमॅटो विकणाऱ्या शेतकऱ्याची हत्यालक्षणीय बाब म्हणजे हत्या झालेल्या शेतकऱ्याने नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमावले आहेत. यामुळेच हत्या केली असल्याचा संशय आहे. शेतकऱ्याकडे एवढे पैसे होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक केसप्पा यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.
तसेच तीन-चार लोकांनी मिळून संबंधित शेतकऱ्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक गंगाधर राव यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित असून त्या बंगळुरू येथे राहतात.