लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या NDA च्या विजयानंतर आज नरेद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारच्या अर्थात मोदी ३.० च्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नेते मंडळींना फोनही यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे समजते.
या नेत्यांना आला फोन - सूत्रांच्या हवाल्याने झीन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फोन आलेल्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह (Rajnath Singh), शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह JDU नेते तथा राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर (Ram Nath Thakur), अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल (Anupriya Patel), लोजपा (राम विलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan), हम प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), रालोद प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary), तसेच टीडीपी खासदार राम नायडू (Ram Naidu) आदींना फोन आले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधियाही घेणार मंत्रीपदाची शपथ -मध्य प्रदेशात भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवरही विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय, ज्योतिरादित्य शिंदे यांनाही मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पोन आला आहे. याशिवाय, JDS चे कुमारास्वामीही मंत्री होणार आहेत.
मोदी मंत्रिमंडळात ज्यांना ज्यांना संधी मिळणार त्यांना फोन जात आहेत. यामुळे ही यादी वाढण्याचीही शक्यता आहे. खरे तर, मोदी 3.0 मंत्रिमंडळाचे स्वरूप कसे असेल, यासंदर्भात केवळ अंदाज लावले जात आहेत. अद्याप अधिकृतपणे कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.
टीडीपीला दोन मंत्रीपदं -यातच, टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाचा खुलासा केला आहे. टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी एक्सवर एका पोस्ट करत, आपल्या पक्षाला मोदी ३.० मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळाले असल्याचे म्हटले आहे. यांपैकी, तीन वेळचे खासदार राम मोहन नायडू हे कॅबिनेट तर पी. चंद्रशेखर पेम्मासनी हे राज्यमंत्री असतील.