नवी दिल्ली - मुलीच्या विवाहाचे वय आता १८ वरुन २१ होणार आहे. याबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विवाहामुळे शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच मोडणाऱ्या मुली आता शिक्षण पूर्ण घेतील अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने मुली, महिला आत्मनिर्भर होतील, असे म्हटले आहे.
सध्या महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे आहे. आता, केंद्र सरकारने मुलींचे लग्नासाठीचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यामागचं उद्देश महत्त्वाचा आहे, देशातील महिलांचे सक्षमीकरण, देश की बेटी सक्षम हो.. हाच हेतू आहे. या निर्णयामुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची आणि करिअर करण्याची, आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळणार असल्याचेही मोदींनी म्हटले. मोदींनी MSME मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन केले आणि पेरुन्थलैवर कामराजर मणिमंडपम-पुद्दुचेरीमधील ओपन-एअर थिएटरसह सभागृहातील युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
मोदींनी देशातील तरुणाईवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, 'स्पर्धा करा आणि जिंका' हा नव्या भारताचा मंत्र आहे. आपण स्पर्धा करू शकतो, अशी भावना देशातील तरुणांमध्ये आहे, जी प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असेही मोदींनी यावेळी बोलताना म्हटले.
करिअरमुळे मुलींच्या लग्नाचे वय लांबले...
शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. मुख्यत: उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचे लग्नाचे वय २५ वर्षांच्या पुढे गेले असून, २७ ते ३० वर्षे या वयामध्ये लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. करिअरमुळे या मुली लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत.
‘त्या’ कायद्याच्या अंमलबजावणीचे काय झाले ?
देशात बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात येऊन १३ वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह होणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिल्या पाच राज्यांमध्ये समावेश आहे. मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असा सवाल अनेकांनी लोकमतसमोर उपस्थित केला.