मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:16 AM2019-11-20T11:16:27+5:302019-11-20T11:18:01+5:30
गुजरात निकालानंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुकांनी पंतप्रधान मोदींना धडा शिकविला आहे.
नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
राजस्थानच्या शहरी मतदारांनी भाजपाला नाकारले आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे, तर भाजपाला फक्त सहा ठिकाणी विजय मिळाला आहे. २० जागांवर अन्य पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. या पार्श्वभुमीवर गहलोत यांनी हे वक्तव्य केले आहे.
मोदी, शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याची कल्पनाही करू नये. कारण काँग्रेसचा डीएनए भारताच्या संस्कार, संस्कृती आणि परंपरेसोबत जुळलेला आहे. भाजपाचे नेते सांगतात एक आणि करतात एक हे आता जनतेला समजू लागले आहे. यामुळेच भाजपाला लोकांनी झिडकारले आहे, असे गहलोत म्हणाले.
गहलोत हे नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गुजरात निकालानंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुकांनी पंतप्रधान मोदींना धडा शिकविला आहे. जनतेने त्यांना यापुढे काँग्रेसमुक्त भारताची गोष्टच न करण्याचे सुचविले आहे. काँग्रेस मुक्त भारत म्हणणारेच कधी ना कधी गायब होणार आहेत. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नेहरुंसारखे नेते तुरुंगात गेले होते. गेल्या 70 वर्षांत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, त्याच उंचीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरात मान मिळतो. हे गेल्य़ा 70 वर्षांतील प्रगतीमुळेच होत आहे. याला कोणी नाकारत असेल तर ते दुर्भाग्याचे आहे, अशी टीकाही गहलोत यांनी केली.