नवी दिल्ली :राजस्थानला आज पहिली 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजस्थानमधून तर पीएम मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी पीएम मोदींनी आपल्या भाषणातून गेहलोत यांना टोमणाही मारला. यावेळी जयपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशिवाय राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
यावेळी पीएम मोदी म्हणाले की, अशोक गेहलोत यांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, दोघेही राजस्थानचे आहेत.मी आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष आभार मानतो. ते सध्या मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत, तरीदेखील या विकासाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ काढला. मी तुमचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असा चिमटा मोटींनी काढला.
पीएम मोदी पुढे म्हणतात, स्वातंत्र्यानंतर लगेच जे काम व्हायला हवे होते, ते काम आम्ही आज करत आहोत. गेहलोत जी, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून काही कामे माझ्यासमोर मांडली आहेत. तुमचा हाच विश्वास आपल्या मैत्रिची ताकत आहे आणि ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल धन्यवाद. पीएम मोदींचे हे वक्तव्य यासाठी महत्वाचे मानले जात आहे, कारण सध्या सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
पीएम मोदींचे संपूर्ण भाषण:-
जयपूर-दिल्ली ट्रेनला सुरुवातपंतप्रधानांनी अजमेर-दिल्ली कॅंट वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राजस्थानच्या भूमीला आज पहिली वंदे भारत ट्रेन मिळत आहे. दिल्ली कॅंट अजमेर वंदे भारत एक्सप्रेसने जयपूर ते दिल्ली प्रवास करणे सोपे होईल. राजस्थानच्या पर्यटनातही याचा खूप उपयोग होईल. वंदे भारत एक्सप्रेसचा राजस्थानच्या पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. या आधुनिक गाड्या सुरू झाल्यापासून सुमारे 60 लाख लोकांनी त्यात प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेन आज विकासाचे, आधुनिकतेचे प्रतीक आहे. वंदे भारताचा आजचा प्रवास, उद्या आपल्याला विकसित भारताच्या प्रवासाकडे नेईल, असेही ते म्हणाले.