नवी दिल्ली: राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. राजकीय मंचावर भाषेची मर्यादा ओलांडून टीका करणारे नेते खासगीत एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने भेटतात-बोलतात. सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय टोकाची टीका करणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दुपारी मोदींसोबतच जेवणाचा आस्वाद घेतला.
एकत्र जेवण केलेआज कृषी मंत्रालयाने सर्व खासदारांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी खर्गे आणि मोदींची भेट झाली. विशेष म्हणजे, यावेळी खर्गे आणि मोदींनी एकाच टेबलवर बसून जेवण केले. एकीकडे पीएम मोदींवर आग ओकणारे खर्गे आज मात्र अतिशय मवाळ झालेले दिसले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.
नरेंद्र मोदींनी केले ट्विट:-
संसदेत भाषेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या खर्गे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना उंदराशी केली होती. त्यापूर्वी खर्गेंनी पंतप्रधान मोदींना 'रावण' म्हटले होते. पण, या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदारांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "आम्ही 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्याची तयारी करत आहोत. आज मी संसदेत खासदारांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी जेवणात बाजरीचे पदार्थ दिले गेले. पक्षाच्या पलीकडे सर्व खासदारांचा सहभाग पाहून आनंद झाला.''
2023 बाजरी वर्ष म्हणून घोषित भारताच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने कृषी मंत्रालयाने खासदारांना विशेष स्नेहभोजन दिले. यात ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ खायला देण्यात आले. पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या विशेष स्नेहभोजनाला हजेरी लावली.