हैदराबादचे खासदार आणि एमआयएमे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या बाबरी मशिदीबाबतच्या विधानावर घणाघाती टीका करताना राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. भाजपा आणि काँग्रेसवर टीका करताना ओवेसी यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे राम आणि शामची जोडी आहे, असा उल्लेख करत काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ओवेसी म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यामध्ये भाजपा आणि आरएसएस एवढीच काँग्रेसची भूमिका होती, हे कमलनाथ यांच्या विधानामुळे सिद्ध झाले आहे. काँग्रेस आणि भाजपा हे हिंदुत्वाच्या विचारसरणीवर काम करत आहेत. आता जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा कुठल्या कार्यक्रमात जातील, तेव्हा ते राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जातील. राम आणि शामची जोडी चांगली दिसेल. भाजपा-काँग्रेस आणि आरएसएसची माता काँग्रेस आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला.
ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्यामध्ये जेवढी भाजपा आणि आरएसएसची भूमिका आहे तेवढीच काँग्रेसचीही भूमिका राहिलेली आहे. कमलनाथ यांचं विधान हे सिद्ध करतं. रातोरात मूर्ती ठेवल्या गेल्या तेव्हा कुणाचं सरकार होतं. पूजा करण्याची परवानगी दिली गेली, तेव्हा सरकार कुणाचं होतं? राजीव गांधी यांनी दरवाजे उघडले. बाबरी मशीद हिरावली गेली. काँग्रेसची बरोबरीची भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा खोटा चेहार का धारणं करते हे विचारलं गेलं पाहिजे, असेही ओवेसी म्हणाले.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान, कमलनाथ म्हणाले होते की, राजीव गांधी यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडले होते. आपण इतिहास विसरता कामा नये. जिथपर्यंत राम मंदिराचा विषय आहे तर ते कुठलाही एक पक्ष किंवा कुठल्या एका व्यक्तीचं होऊ शकत नाही. राम मंदिरा भारतातील सर्व नागरिकांचं आहे. भाजपा राम मंदिराचं श्रेय घेऊ शकत नाही. कमलनाथ यांच्या याच विधानावरून ओवेसींनी काँग्रेसवर निषाणा साधला आहे.