मीरत (उत्तर प्रदेश) - जे लोक गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडू शकले नाहीत ते गरीबांच्या बँका खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आज उत्तर प्रदेशमधील मीरत येथे आयोजित केलेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली. यावेळी मोदींनी विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षांना लक्ष्य केले. यावेळी सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळच्या निवडणुकीत एकीकडे चौकीदार आहे आणि दुसरीकडे डागदार नेत्यांची जमवाजमव आहे. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागितला होता. तुम्हीही मला भरभरून प्रेम दिले. आता गेल्या पाच वर्षांत मी जे काम केले त्याचा सर्व हिशेब तुम्हाला देईन, तसेच इतरांचा हिशेबही घेईन. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू राहतील तेव्हाच योग्य हिशोब होईल. शेवटी मी चौकीदार आहे आणि चौकीदार अन्याय करणार नाही.''काँग्रेसने गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचा केलेल्या घोषणेचाही मोदींनी समाचार घेतला. ''ज्यांना गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडता आले नाही. ते आता गरीबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. ''गेल्या चार दशकांपासून आमचे जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. त्यांचा मागणी पूर्ण करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे.''असे मोदींनी सांगितले.
70 वर्षांत गरिबांची बँक खाती उघडू न शकणारे खात्यात पैसे काय जमा करणार? मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:37 PM