पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी श्रीलंकेला कच्चातिवू बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस देशाची अखंडता आणि हित 'कमकुवत' करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदींची ही प्रतिक्रिया माहितीच्या अधिकाराच्या (RTI) रिपोर्टनंतर आली आहे, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 1974 मध्ये श्रीलंकेला कच्चातिवू बेट कसं दिलं होतं याबाबत खुलासा झाला आहे.
RTI रिपोर्ट हा 'डोळे उघडणारा आणि धक्कादायक' असल्याचं वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या कृतीमुळे लोकांना राग आला आहे आणि काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, "हे डोळे उघडणारे आणि धक्कादायक आहे! नवीन तथ्ये उघड करतात की, काँग्रेसने कसं कच्चातिवू बेट श्रीलंकेला सुपूर्द केलं. याचा प्रत्येक भारतीयाला राग आहे आणि आपण काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही हे लोकांच्या मनात आहे. भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने स्वतः कच्चातिवू सोडलं आणि त्यांना याबद्दल कोणताही पश्चात्ताप झाला नाही. कधी काँग्रेसचे खासदार देशाचे विभाजन करण्याविषयी बोलतात, तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांना बदनाम करतात. यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचे दिसून येते. त्यांना फक्त आपला देश तोडायचा आहे" असं अमित शाह यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.