नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलीला मैदानावरून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. दिल्लीतील पाणी आणि परिवहन व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारवर जनतेची कामे केली नसल्याचा आरोप केला.
दिल्लीतील पाण्याच्या समस्येवर राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. दूषित पाण्याच्या समस्येवर राज्य सरकार गप्प बसले आहे. दिल्लीत आरओची विक्री मोठ्याप्रमाणात होते. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या समस्येवरून राजकारण करण्यात येत आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर हल्लाबोल केला.
याचबरोबर, दिल्लीतील बस गाड्यांच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकार दिल्लीतील लोकांना योग्यरित्या बसेसची सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. यासाठी आम्ही दिल्लीत मेट्रोचा विस्तार केला. यामुळे लोकांना कोठेही जाण्या-येण्यास सुविधा मिळत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला. दिल्लीच्या मेट्रोच्या मार्गात 70 किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा 25 किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याशिवाय, 40 लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. 1200 पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात, असेही सांगत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.