पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदी यांनी सकाळी नाहन आणि दुपारी मंडी येथे जाहीर सभांना संबोधित केलं. मंडीमध्ये मोदींनी भाजपा उमेदवार कंगना राणौतला मोठा विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले की, "कंगनाला विजयी करून संसदेत पाठवायचे आहे, कारण आगामी काळात ती लोकांचा आवाज बनेल आणि मंडीच्या विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करेल. जनतेला कंगना रणौतच्या विजयाचा बंपर रेकॉर्ड बनवायचा आहे."
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कंगना राणौतचं भरभरून कौतुक केल आहे. "कंगना राणौत हजारो तरुणांच्या आशांचं प्रतिनिधित्व करते. कंगनाने स्वत:च्या बळावर जगभर नाव कमावलं आणि काँग्रेस अशा मुलींच्या विरोधात आहे. काँग्रेस नेत्यांनी कंगना रणौत यांच्याविरोधात जे विधान केलं. ते अतिशय वाईट आणि चुकीचं होतं."
"काँग्रेस पक्ष महिलांविरोधी आहे"
"आजपर्यंत काँग्रेसने याबद्दल माफीही मागितलेली नाही हे खेदजनक आहे. हिमाचल प्रदेश ही महिलांची भूमी असून येथील मुलींचा काँग्रेस नेत्यांनी अपमान केला आहे. आपण 21व्या शतकात आहोत, पण काँग्रेस 19व्या शतकाकडे वाटचाल करत आहे. काँग्रेसचे राजघराणे मुलींच्या विरोधात असून काँग्रेस पक्ष महिलांविरोधी आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.
हिमाचल प्रदेशातील देवी-देवता आशीर्वाद देत असून काँग्रेस राम मंदिराला विरोध करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "जनतेच्या मताच्या बळावरच राम मंदिराची उभारणी झाली. नागरिक सुधारणा कायदा लागू झाला. सैनिकांना OROP मिळू शकेल. लोकांच्या मतदानाच्या बळामुळेच भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे कामही सरकारने केले आहे."
"काँग्रेसला भारताला जुन्या काळात ढकलायचं आहे"
"2014 आणि 2019 प्रमाणे यावेळीही भारतीय जनता पक्षाला चारही जागा जिंकायच्या आहेत. काँग्रेसला भारताला जुन्या काळात ढकलायचं आहे. जिथे गरिबी, संकट आणि नागरी समस्या आहेत. काँग्रेस भारताला पुन्हा एकदा जुन्या स्थितीत आणण्यासाठी आली आहे" असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.