नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशानं पूर्ण बहुमत दिलं आहे. आमच्यासाठी मोदीच सुप्रीम कोर्ट आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अयोध्येत राम मंदिर पुनर्निर्माणाची योग्य वेळ आली आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. आता मंदिराच्या निर्माणात उशीर व्हायला नको. राम मंदिराचं पुनर्निर्माण लवकरच होणार आहे.सारखं सारखं मंदिराच्या नावानं जनतेकडे मतं नाही मागता येत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी सर्व खासदारांबरोबर अयोध्येत रामलल्लाचं दर्शन करणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. लोकसभेच्या उपाध्यक्षपदासंदर्भात छेडले असता ते म्हणाले, भाजपानंतर एनडीएमध्ये सर्वाधिक खासदार आमचे आहेत. त्यामुळे लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक अधिकार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी यावर भाष्य केलं आहे. भाजपाकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार आहेत. तर एनडीएकडे 350हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा दावा आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.