बंगळुरु - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अभिनेता प्रकाश राज यांनी टीका केली असून आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे. प्रकाश राज बोलले आहेत की, 'गौरी लंकेश यांची हत्या करणा-यांना पकडलं जाऊ शकतं किंवा नाही, मात्र याशिवाय सोशल मीडियावर काही असे लोक आहेत जे गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. हे लोक कोणत्या विचारधारेपासून प्रभावित आहेत हे सर्वांनाच माहित आहे. यामधील काही लोक तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ही गोष्ट मला घाबरवते. आपला देश कोणत्या दिशेने जात आहे ?'
प्रकाश राज बंगळुरु येथील डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी परखडपणे आपलं मत पुरस्कार परत करण्याची धमकी दिली.
चित्रपटातील नकारात्मक भुमिकांसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नरेंद्र मोदी तर माझ्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत असं म्हटलं आहे. प्रकाश राज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा आनंद साजरा करणा-यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. आपले पुरस्कार आपण परत करु असंही ते यावेळी बोलले आहेत.
प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत म्हटलं की, 'मी एक कसलेला अभिनेता आहे. तुमचा अभिनय मला कळणार नाही असं खरंच तुम्हाला वाटतं का ?'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड संतापलेल्या प्रकाश राज यांनी सांगितलं की, 'गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलेल्या मौनामुळे मी नाराज आहे. मौन बाळगून मोदी अशाप्रकारच्या घटनांना समर्थन देत आहेत का ? ज्याचा त्यांचे फॉलोअर्स आनंद व्यक्त करत आहेत'.
प्रकाश राज यांनी म्हटलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मौन कायम ठेवलं तर आपण आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्यात अजिबात वेळ लावणार नाही. प्रकाश राज हे गौरी लंकेश आणि त्यांच्या वडिलांचे चांगले मित्र आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते गौरी लंकेश यांना ओळखत होते.
गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.