नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आपल्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी आईसोबत चर्चा केली आणि जेवण सुद्धा केले. त्यानंतर दिल्लीला रवाना झाले. नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवशी आईची भेट घेऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत गुजरातच्या अहमदाबाद येथे दाखल झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी विमानतळावर जाऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले.
आज नरेंद्र मोदींनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातच्या वेगवगळ्या भागात दौरा केला. यावेळी त्यांनी केवाडियातील सरदार सरोवर धरण येथे भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची पाहणी केली. तसेच, येथील बटरफ्लाय गार्डनला भेट दिली. त्यानंतर नर्मदा नदीची पूजा आणि आरती केली. १०० पुजाऱ्यांद्वारे ही पूजा संपन्न झाली. याशिवाय, गुरुदेश्वर दत्त मंदिरात त्यांनी पूजा आणि आरती केली.
दरम्यान, ट्विटरवर #HappyBdayPMModi, #NarendraModiBirthday, #HappyBirthdayPM, #happybirthdaynarendramodi, #NarendraModi हे हॅशटॅग्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त भाजपा नेत्यांनीही ट्विटरवरून मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.