नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच ट्विटरवर #HappyBdayPMModi, #NarendraModiBirthday, #HappyBirthdayPM, #happybirthdaynarendramodi, #NarendraModi हे हॅशटॅग्स ट्रेंडिंगमध्ये आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदी हे दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमाचे प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. 'तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख निर्माण केली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचं अभूतपूर्व योगदान आहे' असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.
अमित शहा यांनी 'मोदीजींनी एक रिफार्मिस्टच्या रुपात केवळ राजकारणाला एक नवी दिशाच दिली नाही, तर आर्थिक सुधारणेसोबतच दशकांपासून चालत आलेल्या समस्या सोडवण्याचं काम केलं. प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला अधिक चांगलं बनवण्यासाठी तुमचे परिश्रम आणि संकल्प आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. एक जनप्रतिनिधी, एक कार्यकर्ता आणि एक देशवासी या रुपात तुमच्यासोबत राष्ट्रीय पुनर्रचनेत भागीदार होणे हे माझे सुदैव आहे. तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि दीर्घायुषी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना' असं म्हटलं आहे.
भारतीय जनता पार्टीकडूनही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम राबविले जातील. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह अन्य पदाधिकारीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. भाजपाने आपल्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 'नरेंद्र भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे' असं ट्वीट गडकरींनी केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक नेते मंडळींनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.