नवी दिल्ली - दिल्लीत एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड केली. या निवडीनंतर नेत्यांचे खासदारांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिले. मात्र त्याआधी मोदींनी भारताचे संविधान याच्या पुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला. त्यावेळी उपस्थित खासदारांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
यावेळी भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, बाबासाहेबांनी तपस्या करुन केलेलं संविधान सर्वोच्च आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्याच्या कसोटीत राहून काम केलं तर कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. संविधानाची साक्ष ठेऊन संकल्प करा, या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचं काम करा. समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे.
तसेच महात्मा गांधी, पंडीत दिनदयाळ उपाध्यय, राममनोहर लोहिया या तीन महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चला, हे विचार तुम्हाला पुढे आणतील. आज राजकारणात या तीन विचारधारेची माणसं वर्चस्व करतात. मग ती माणसं दुसऱ्या राजकीय पक्षातही का असेना. पण या महापुरुषांचे विचार त्यांना प्रगल्भ करतात असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
एनडीएची आज दिल्लीत बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.
शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंग बादल, एलजेपीचे नेते रामविलास पासवान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या एनडीएचे नेतेपदीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. 353 खासदारांचे समर्थन असणाऱ्या संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली तसेच देशाच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन केले त्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्यांचे आभार मानले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही घटक पक्षांचे आणि खासदारांचे आभार व्यक्त केले.